✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ फेब्रुवारी २०२६ |नवी दिल्ली : धकाधकीची जीवनशैली, ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच ‘हायपरटेन्शन’ वेगाने वाढत आहे. एकदा बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या की त्या आयुष्यभर घ्याव्या लागतात, हा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र आता या चित्रात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नव्या संशोधनानुसार, वर्षातून केवळ दोन इंजेक्शन घेऊन रक्तदाब सहा-सहा महिने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. त्यामुळे रोज गोळ्या घेण्याची गरज भविष्यात कमी होऊ शकते.
हे संशोधन जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक The Lancet मध्ये प्रसिद्ध झाले आहे. अभ्यासामध्ये ‘जिलेबेसरान’ (Zilebesiran) या नव्या औषधाची क्लिनिकल चाचणी करण्यात आली. हे औषध ‘स्मॉल इंटरफिअरिंग आरएनए’ (siRNA) या प्रगत जैवतंत्रज्ञानावर आधारित आहे. शरीरातील यकृतामध्ये तयार होणाऱ्या ‘अँजियोटेन्सिनोजेन’ या प्रथिनाचे उत्पादन कमी करून हे औषध काम करते. हेच प्रथिन रक्तदाब वाढवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. प्राथमिक निष्कर्षांनुसार, त्वचेखाली दिलेले एक इंजेक्शन तब्बल सहा महिन्यांपर्यंत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात सक्षम ठरले.
तज्ज्ञांच्या मते, हा उपचार अद्याप संशोधन आणि चाचणी टप्प्यात असून सर्वसामान्य वापरासाठी उपलब्ध होण्यास काही काळ लागू शकतो. दीर्घकालीन सुरक्षितता, दुष्परिणाम आणि विविध वयोगटांवरील परिणाम याबाबत पुढील अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे सध्या बीपीच्या गोळ्या स्वतःहून बंद करणे धोकादायक ठरू शकते. कोणताही उपचार बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. मात्र, भविष्यात उच्च रक्तदाबाच्या उपचारात ही पद्धत मोठा बदल घडवू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
