आता तसं होणार नाही ; इंदापुरात ‘दादांचा वादा’, पाटलांचे ‘हर्ष’ वर्धन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। इंदापूर : ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या बैठकीत जे ठरले आहे त्या शब्दाची पूर्तता होईल, हा अजित पवारचा शब्द आहे. विधानसभेला महायुतीचा धर्म पाळला जाईल,’ असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. पवार यांच्या विधानाने इंदापूर विधानसभेची महायुतीची उमेदवारी इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना की त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांना मिळणार, ही चर्चा सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. सुनेत्रा पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुतराव वणवे, अंकिता पाटील, निहार ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, विलासराव वाघमोडे, कृष्णाजी यादव, राजवर्धन पाटील, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मदत घेतली जाते. मात्र विधानसभेला शब्द पाळला जात नाही, अशी भावना कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली. मागील काळात आमचे वरिष्ठ नेते शब्द देत होते. मात्र आता तसे होणार नाही.’

‘आपला संघर्ष झाला; पण तो राजकीय होता. वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे; पण कार्यकर्त्यांचा मानसन्मान झाला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा आमचा स्वभाव आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो; पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. तो आत्ता दूर झाला आहे,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *