महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ खातेवाटपाचा विस्तार अखेर झाला आहे. महायुती सरकारने मंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर खातेवाटप होत नसल्याने विरोधी पक्षातील नेते महायुती सरकारवर निशाणा साधत होते. या खातेवाटपाआधी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी अधिवेशनावेळी विरोधी नेत्यांनी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडवर उघडपणे आरोप केला जात आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये अशी मागणी होत होती. मात्र खातेवाटपामध्ये त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळातील खातेवाटपामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी काम पाहिले होते. तर मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे खाते धनंजय मुंडेंकडे आले आहे. जेव्हा मंत्रिमंडळाचा शपधविधी होण्याआधी राष्ट्रवादीमधील दोन नावे अगदी शेवटी जाहीर झाली होती. यामध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे गॅसवर पाहायला मिळाले होते. मात्र धनंजय मुंडे यांचे नाव जाहीर झाले पण छगन भुजबळ यांचा पत्ता कट झालेला पाहायला मिळाला होता
छगन भुजबळांच्या जागी कोणाला मिळालेली संधी?
राष्ट्रवादीच्या यादीमधील छगन भुजबळ यांच्या जागी माणिकराव कोकाटे यांचे नाव जाहीर झाले होते. खातेवाटपामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. जे शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे पाहत होते. या खात्यामध्ये मोठा पिक विमा घोटाळा झाल्याचा आरोप अधिवेशनामध्ये भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी केला आहे. खोटी नाव चढवून करोडो रूपयांचा घोटाळा झाल्याचं धस यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकड कृषीमंत्रिपद असल्याने अजूनही त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री
1) आदिती तटकरे – महिला व बालकल्याण
2) बाबासाहेब पाटील – सहकार
3) दत्तमामा भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास
4) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
5) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
६) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
७) माणिकराव कोकाटे – कृषी
८) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
९) इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास
१०) अजित पवार – अर्थमंत्री, उत्पादन शूल्क