महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। Shyam Benegal Passed Away : ‘मंथन’, ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ अशा अनेक समांतर सिनेमांचे निर्माते व दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. भारतीय सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणारे श्याम बेनेगल यांनी आज (२३ डिसेंबरला) अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त खरे आहे, असं पियाने सांगितलं.
श्याम बेनेगल ९० वर्षांचे होते. आज संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं त्यांच्या मुलीने सांगितलं. पिया बेनेगल ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाली, “श्याम बेनेगल यांचे आज (२३ डिसेंबरला) संध्याकाळी ६.३० वाजता निधन झाले.”
पिया बेनेगलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी श्याम बेनेगल यांची प्राणज्योत मालवली. श्याम बेनेगल बऱ्याच काळापासून क्रोनिक किडनीच्या समस्येने ग्रस्त होते. ते या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. आज उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.
श्याम बेनेगल यांचा नुकताच १४ डिसेंबर रोजी ९० वा वाढदिवस झाला.