महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। देशात भारत माला प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात भारत सरकार पुणे-बंगळुरु द्रुतगती महामार्ग उभारणार आहे. हा प्रकल्प एनएच-४८ महामार्गाला समांतर असणार आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक अधिक सुखकर होण्याच्या हा महामार्ग महत्त्वपूर्ण असणार आहे.
रस्त्यांची संख्या वाढवणे, त्यांचा विस्तार करणे, महामार्गांची गुणवत्ता वाढवणे या दृष्टिकोनातून भारत माला प्रकल्प सुरु झाला. त्यातील पुणे-बंगळुरु महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता मुंबईहून बंगळुरुला जाण्यासाठी १८-१९ तास लागतात. तेच पुणे ते बंगळुरु हा प्रवास १५-१६ तास इतका आहे. नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे-बंगळुरु प्रवास ७ ते ८ तासांचा होणार आहे. हा महामार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्याने पुढे मुंबईहून बंगळुरुला जायला ९-१० तासांचा कालावधी लागणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१९ मध्ये नव्या पुणे-बंगळुरु द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती. महामार्गाच्या निमित्तीसाठी ४०,००० ते ५०,००० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग ७०० किमीचा असून ६ ते ८ लेनपर्यंत विस्तारला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळ महामार्गाच्या बांधकामाकडे देखरेख ठेवणार आहे. नवा द्रुतगती महामार्ग अॅक्सेस-कंट्रोल ग्रीनफिल्ड स्वरुपाचा असणार आहे.
वाहने ताशी १२० किमी वेगाने प्रवास करु शकतील अशी रचना करण्यात येणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्याने दोन्ही महानगरांमधील अंतर तब्बल १४० किमीने कमी होईल. महामार्गात २ आपत्कालीन हवाई पट्ट्या असणार आहेत. वेगवेगळ्या २२ ठिकाणी महामार्गाला इतर रस्ते जोडले जातील. हा रस्ता पूर्णपणे पूरप्रतिरोधक असणार आहे.
पुणे-बंगळुरु द्रुतगती महामार्गाची रुंदी अंदाजे १०० मीटर आहे. तसेच रुंदी ६९९ किमी इतकी असणार आहे. एकूण ६९९ किमी रस्त्यापैकी ७२ किमीचे काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग २०२८ पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे-बंगळुरु दोन्ही शहरे आयटी हब आहेत. या महामार्गामुळे दोन्ही आयटी हबमधील प्रवास कमी आणि सुलभ होणार आहे.