मेलबर्न गहिवरला ! नितीश रेड्डीच्या शतकानंतर पहाडासारखा माणूस स्टेडियममध्येच रडला -VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२८ डिसेंबर ।। मेलबर्नचं मैदान, ८० हजारांहून अधिक फॅन्स आणि आपली पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या नितीश कुमारचं स्वप्नं सत्यात उतरलं. भारतीय संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या खंबीरपणे उभा राहिला आणि भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं.

नितीशने नाबाद १०५ धावांची खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. त्याचं हे शतक पाहण्यासाठी त्याचे वडिलही स्टँड्समध्ये उपस्थित होते. दरम्यान पोराने शतक झळकावताच वडिलांना अश्रू अनावर झाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आपल्या मुलाने एक दिवस भारतीय संघासाठी खेळावं हे नितीशच्या वडिलांचं स्वप्नं होतं. हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्वकाही पणाला लावलं. अखेर मुलाने त्यांचं हे स्वप्नं पूर्ण केलं. पर्थच्या मैदानावर झालेल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता चौथ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे.

वडिलांना अश्रू अनावर
नितीश कुमार रेड्डीला क्रिकेटपटू बनविण्यासाठीच त्याच्या वडिलांनी आपली नोकरी सोडली. त्यानंतर त्याच्या आईने नोकरी करायला सुरुवात केली. आई- वडील आपल्यासाठी घेत असलेली मेहनत पाहून नितीश रेड्डीनेही डबल मेहनत घेतली. आता नितीशने आपल्या वडिलांसमोरच शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण करताच, त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्याचे वडिल भावुक झाले होते.

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत धमाका
नितीश कुमार रेड्डी या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत या यादीत यशस्वी जयस्वाल अव्वल स्थानी होता. मात्र आता त्याने जयस्वालला मागे सोडलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापासून तो भारतीय संघासाठी संकटमोचक ठरतोय.

सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये त्याने सर्वात मोठी खेळी केली होती. मात्र या सामन्यात संघाला गरज असताना त्याने शानदार शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं आहे. दरम्यान त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून शतकी भागीदारी देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *