Video: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ‘हा’ खेळाडू आला फुल फॉर्ममध्ये ! ३ षटकात दिले २ धक्के

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा सुरू असून उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राचा सामना शनिवारी (११ जानेवारी) पंजाबविरुद्ध खेळला जात आहे. ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड होण्यापूर्वी खेळली जात असल्याने महत्त्वाची मानली जात आहे.

अशात खेळाडूही आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच अर्शदीप सिंगने सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सही घेतले आहेत.

शनिवारीही त्याने पंजाबला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यात महाराष्ट्र संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पहिल्याच षटकात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका चौकारासह ५ धावा केल्या. मात्र त्याच्या चौकारानंतर लगेचच सहाव्या चेंडूवर त्याला अर्शदीपने एक सुरेख चेंडू टाकून त्रिफळचीत केले. त्यामुळे ऋतुराजला ५ धावांवर माघारी परतावे लागले.

त्यानंतर तिसऱ्या षटकात पुन्हा अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. या षटकात त्याने सिद्धेश वीरला चूक करण्यात भाग पाडले. त्याला शून्यावर माघारी धाडले. त्यामुळे महाराष्ट्राला तीन षटकातच ८ धावांवर २ धक्के बसले होते.

मात्र, नंतर अर्शिन कुलकर्णी आणि अंकित बावणे यांनी शतकी भागीदारीही केली. त्यामुळे ३० षटकांच्या आतच महाराष्ट्राने १३० धावांचा टप्पा ओलांडला होता.

अर्शदीप सिंग फॉर्ममध्ये
पंजाबकडून खेळणाऱ्या अर्शदीपने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गेल्या दोन सामन्यात म्हणजेच पाँडिचेरी आणि हैदराबाद या संघांविरुद्ध प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मुंबईविरुद्ध देखील ३८ धावांत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

त्याने आत्तापर्यंत विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत २० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे पंजाबसाठी त्याची गोलंदाजी ही या हंगामातील जमेची बाजू ठरत आहे. त्याने जवळपास सर्व सामन्यात पंजाबसाठी विकेट्स मिळवल्या आहेत.

भारतीय संघात निवड होणार?
अर्शदीप भारताच्या टी२० संघातील नियमित खेळाडू आहे. मात्र, वनडेत त्याला सातत्याने अशी संधी मिळत नाही. पण आता आगमी इंग्लडविरुद्धच्या टी२० व वनडे मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची भारताच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे.

भारताला इंग्लंडविरुद्ध २२ जानेवारीपासून ५ टी२० सामन्यांची मालिका आणि ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *