Onion New Variety: ‘एनएचआरडीएफ’कडून कांद्याचे नवीन वाण विकसित ; कांदा आता अधिक काळ टिकणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेने कांद्याचे नवे वाण विकसित केले आहे. पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेत या वाणाची टिकवणक्षमता जास्त म्हणजे काढणीपश्चात तीन महिन्यांपर्यंत असणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने या वाणाचा प्रसार करण्याची शिफारस केली आहे. या वाणास अद्याप अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयात वाणप्रसार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होऊन सरकारकडून अधिसूचना काढली जाणार आहे. हे वाण प्रत्यक्ष बाजारात येण्यासाठी अद्याप कायदेशीर प्रक्रिया बाकी असल्याने काही कालावधी लागू शकेल.

एनएचआरडीएफ संस्थेद्वारे आत्तापर्यंत खरीप, लेट खरीप व उन्हाळी कांद्याचे वाण विकसित करण्यात आले आहे. आता नव्या प्रकारच्या वाणामध्ये ‘एल-८८३’ हे खरीप व लेट खरीप लागवडीसाठी शिफारस असलेले वाण विकसित करण्यात आले आहे. सुमारे सात-आठ वर्षांपासून याबाबत संशोधन व चाचण्या सुरू होत्या. पुनर्लागवडीनंतर सुमारे ८५ दिवसांच्या कालावधीमध्ये हे वाण काढणीसाठी तयार होऊ शकते.

‘या संदर्भात अद्याप प्रक्रिया सुरू आहे. या वाणाच्या काही भौगोलिक चाचण्या अद्याप सुरू आहेत. त्याबाबत अधिकृत निष्कर्ष आमच्या हाती आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल. मात्र, कांद्याचे हे नवे वाण कांदा संशोधनातील महत्त्वाचा टप्पा ठरेल,’ असा विश्वास ‘एनएचआरडीएफ’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

काही केंद्रांवर नव्या वाणाच्या चाचण्या
बाजारपेठेच्या मागणीनुसार कांद्याचे वाण विकसित करण्यावर भर देण्यात येत होता. यासाठी २०१६पासून चाचण्या घेण्यात येत होत्या. नंतरच्या टप्प्यात आणखी काही भौगोलिक परिसरामध्ये चाचण्या घेऊन निष्कर्ष काढण्यात आले. आता नुकतीच भारतीय कृषी संशोधन परिषदेने या वाणाच्या प्रचारासाठी मान्यता दिली आहे. या वाणाबाबत पूर्ण कायदेशीर व तांत्रिक प्रक्रियेनंतर अधिसूचना काढण्यात येईल. यानंतर शेतकऱ्यांपर्यंत हे वाण पोहोचविले जाणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये या वाणाच्या लागवडी करून त्यांचे निष्कर्ष एकत्रित करण्यात आले होते. यात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये या वाणाबाबत अनुकूल निष्कर्ष उपलब्ध झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात चितेगाव (ता. निफाड) येथील संशोधन केंद्रावरही या वाणाच्या प्रायोगिक तत्त्वावर लागवडी करण्यात आल्या होत्या.

नव्या वाणाची वैशिष्ट्ये…
■ सात-आठ वर्षांपासून नव्या वाणावर संशोधन
■ काढणीपश्चात तीन महिने टिकवणक्षमता
■ जमिनीतील जास्तीच्या ओलाव्याशी जुळवून घेण्याची क्षमता
■ प्रतिहेक्टर उत्पादकता वाढणे शक्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *