Walmik Karad | परळी पूर्वपदावर; दोन दिवसांपासून खोळंबलेले व्यवहार सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। मस्साजोग खंडणी प्रकरणातील व मकोका अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याच्या समर्थकांनी मंगळवारी सुरू केलेल्या आंदोलनानंतर सलग दोन दिवस परळी शहर बंद होते. परळीतील बाजारपेठही दोन दिवस बंद होती. आज गुरुवारी सकाळपासून बाजारपेठ उघडली असून परळी शहरातील खोळंबलेले व्यवहार व लोकजीवन पूर्वपदावर आले आहे.

वाल्मीक कराड याच्या समर्थनार्थ मंगळवार पासून सुरू झालेल्या आंदोलनाचा सिलसिला सलग दोन दिवस सुरूच होता. परळीची बाजारपेठ सलग दोन दिवस बंदच राहिली होती. तर परळी तालुक्यातील मोठी गावे व मोठी बाजारपेठ असलेल्या धर्मापुरी आणि सिरसाळा येथेही बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर ठिकठिकाणी वाल्मीक कराड समर्थकांच्या वतीने आत्मदहनाचे प्रयत्न, टॉवर व पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, रस्ता रोको सह विविध आंदोलने सुरू होती. सलग दोन दिवस परळी येथील बाजारपेठ बंद होती. वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर परळीची बाजारपेठ बंद झाली होती. काल दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली नव्हती. आज संपूर्ण बाजारपेठ उघडण्यात आलेली आहे. शहरातील आडत बाजारपेठ, किराणा लाईन, मेन रोड, राणी लक्ष्मीबाई टावर, नेहरू चौक, स्टेशन रोड व अन्य ठिकाणची दुकाने सुरु झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *