महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ जानेवारी ।। रवीवार ।। पिंपरी चिंचवड ।। देशात समलैंगिकतेला मान्यता मिळाल्यानंतर देशात दुसऱ्यांदा आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. नारी – दी वुमेन या सामाजिक संस्थेद्वारे या देखण्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता हिंदू प्रथा परंपरेनुसार पाच तृतीयपंथिय जोडप्यांचे लग्न पार पडणार असल्याची माहिती नारी – दी वुमेन संस्थेच्या कार्याध्यक्षा अर्चना मेंगडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन नारी – दी वुमेन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, कार्याध्यक्ष विशाल जाधव तसेच पवना समाचारचे संपादक नाना कांबळे या परिवर्तनशील विचारांच्या कृतिशील व्यक्तिंनी एकत्र येऊन नारी – दी वुमेन या संस्थेच्या माध्यमातून केले आहे.
हा विवाह सोहळा काळेवाडी येथील हिंदुस्तान बेकरीच्या पाठीमागे बालाजी लॉन्स या ठिकाणी होणार असून, दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान भोजन समारंभ असणार आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्यौगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, असे आवाहन नारी – दी वुमन या संस्थेच्यावतीने आयोजकांनी केले आहे.
परिवर्तनात्मक संदेश देणारा अनोखा विवाह सोहळा
पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी यापूर्वीच तृतियपंथियांना महापालिका सेवेत सिक्युरिटी, ग्रिन मार्शल, सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीची संधी देऊन तृतियपंथियांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे तृतीयपंथियांना समाजात माणूस म्हणूस ताठ मानेने जगता येऊ लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सामुदायिक विवाह सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात परिवर्तनात्मक संदेश देणारा ठरेल, असा विश्वास आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे.