महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२६ जानेवारी ।। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी पुण्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमबाबत प्रशासन सतर्क झालेय, उपाययोजना करण्यात येत आहे.
जीबीएस आजारावर उपचारासाठी मोठा खर्च लागतो. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पुण्यात या रूग्णांची संख्या वाढत आहे. पुणेकरांनी या आजारावर मोफत उपचार केले जावेत, अशी मागणी केली होती. ही मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. अजित पवार यांनी याबाबत आज घोषणा केली. आता पुण्यात जीबीएस आजारावर मोफत उपचार होणार आहेत.
GBS आजरावर पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. पुण्यात GBS चे सध्या 74 रुग्ण आहेत. त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर. तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. प्रशासनाकडून जीबीएस आजारासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, काळजी घ्यावी असं आवाहन आज अजित पवारांनी केलं आहे.
कमला नेहरू रूग्णालयात आता जीबीएसवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या रूग्णालयात 50 बेड आणि 15आय सी यू आरक्षित करण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची थोड्याच वेळात बैठक घेणार आहेत.
ज्या खासगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खासगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.