महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भुषवत आहे. भारतीय संघ हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणार आहे. अशा स्थितीत आता दुबईत होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री आजपासून (3 फेब्रुवारी) सुरू होत आहे. (Champions Trophy IND vs PAK Tickets)
आयसीसीच्या माहितीनुसार, दुबईमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील. प्रेक्षकांनी आयसीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.iccchampionstrophy.com/tickets ला भेट देऊन ऑनलाइन तिकिटे बुक करावीत. सौदी अरेबियाच्या चलनात सर्वात स्वस्त तिकीट 125 दिरहम इतके असेल. याची भारतीय चलनातील किंमत सुमारे 3 हजार रुपये इतकी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 8 विविध संघ सहभागी होणार आहेत, ज्यांची विभागणी चार संघांच्या दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघांचे सामने पाकिस्तानात होणार आहेत. भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. ही स्पर्धा 19 दिवस चालणार असून स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जातील.
9 मार्च रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्याची तिकीट विक्री दुबईतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर सुरू होईल, अशी माहितीही आयसीसीने दिली आहे. तब्बल आठ वर्षांनी होणाऱ्या या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वच संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. येत्या 12 फेब्रुवारीपर्यंत या संघांमध्ये बदल करण्याची अखेरची संधी असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
23 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळवला जाईल)
10 मार्च – राखीव दिवस