महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनीवार दि. २२ फेब्रुवारी ।। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. विकी कौशलचे आणि संपूर्ण चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. याच दरम्यान छावा चित्रपट वादात भोवऱ्यात अडकल्याचे म्हटले जात आहे.
छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी मदत केल्याचे दाखवण्यात आले आहेत. यावरुनच वाद सुरु झाला आहे. शिर्के घराण्याच्या वंशजांनी छावावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी शिर्के यांनी गद्दारी केल्याचे पुरावे नसल्याचे म्हटले आहे.
शिर्केचे वंशज दीपक शिर्के यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘गणोजी राजे शिर्के यांनी औंरगजेबाच्या सैन्याला वाट दाखवली नाही. याबाबत कोणताही पुरावा नाही. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात. यावरुन आम्ही राज्यभर आंदोलन उभं करणार आहोत’
‘छावा चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली आहे. जाणीवपूर्वक इतिहास बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केले जात आहे. षडयंत्र करुन बदनामी केली जात आहे. लोकांना चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. आम्हाला टार्गेट केले जात आहे. त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही. लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीची जे प्रकाशक आहेत, त्यांना पुरावे दाखवा अशी नोटीस पाठवली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की, यावर तुमचं मत काय आहे आमचा सल्ला घेतला गेला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावे, अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. त्यांनी चूक केली आहे’, असे दीपक शिर्के म्हणाले.
‘छावा कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांचीही आम्ही भेट घेतली होती. समजता तेढ निर्माण केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही. मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे. गणोजी राजे शिर्के यांनी वाट दाखवली नाही. लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटिक लॅबिरीटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला आहे’, असे वक्तव्य शिर्के घराण्याच्या वंशजांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.