महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। कुंभमेळ्यादम्यान त्रिवेणी संगमावरील पाण्याची गुणवत्ता ही स्नानासाठी योग्य होती असा अहवाल, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने(सीपीसीबी) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सादर केला आहे. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आल्याचे ‘सीपीसीबी’ने सांगितले आहे.
या अहवालानुसार प्रयागराज येथून विविधवेळी आणि विविध ठिकाणाहून नमुने गोळा करून त्याची तपासणी केली आहे. त्यामुळे या सर्व आकडेवारीचे सांख्यिकीय विश्लेषण करणे आवश्यक होते. सात मार्चला न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावर हा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला.
आठवड्यातून दोनदा परीक्षण
या अहवालानुसार प्रयागराज येथील नद्यांमधील पाण्याचे १२ जानेवारीपासून आठवड्यातून दोन वेळा परीक्षण केले जात होते. यात गंगेतील पाच ठिकाणाहून आणि यमुनेतील दोन ठिकाणाहून नमुने गोळा केले जात होते.
एकाच नमुन्यासाठी विविध मानकांच्या आधारी तपासणी केली जात होती. यात प्रामुख्याने, पीएच, डिझॉल्व आॅक्सिजन(डीओ), बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड(बीओडी) आणि फेकल कोलिफॉर्म काउंट(एफसी) यांची तपासणी केली जात होती.
तज्ज्ञ समितीने या अहवालातील उपलब्ध आकडेवारीमधील वैविध्याबद्दल माहिती देताना सांगितले की, नमुना घेतला त्या भागातील पाण्याची गुणवत्ता, तेथील भाविकांची बदलती संख्या, प्रवाहाची स्थिती, नमुना घेण्याची वेळ यांसह अनेक घटकांमुळे आकडेवारीत वैविध्य दिसून येण्याची शक्यता अधिक आहे.