चॅम्पियन्स ट्रॉफी देताना पाकिस्तानचा अपमान? शोएब अख्तर, वसीम अक्रमचा संताप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। चॅम्पियन्स ट्रॉफीची रंगदार स्पर्धा रविवारी संपली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह भारतीय संघाने विक्रमी चौथ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCB हे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे अधिकृत यजमान होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे सामना संपल्यानंतरच्या सोहळ्यात पाकिस्तानचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे आता गोंधळ होत आहे. निम्म्याहून अधिक सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले, परंतु अंतिम सामन्यासह भारताचे सर्व सामने दुबईत खेळले गेले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा पारितोषिक वितरण समारंभ झाला तेव्हा पीसीबीचा एकही अधिकारी मंचावर उपस्थित नव्हता. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि वसीम अक्रम यामुळे संतापले आहे.

पाकिस्तानचा अपमान झाला
दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या समारोप समारंभात आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मंचावर आमंत्रित न केल्याने रविवारी वाद निर्माण झाला. एका सूत्राने सांगितले की, पीसीबीचे मुख्य कार्यकारी सुमैर अहमद मैदानावर उपस्थित होते, परंतु त्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.

शोएब अख्तरने सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
शोएब अख्तर व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, ” भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही प्रतिनिधी तिथे उभा नव्हता. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत होता आणि इथे पाकिस्तानचा एकही प्रतिनिधी उभा नव्हता. हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे, प्रतिनिधित्व करायला कोणी का आले नाही? ट्रॉफी देण्यासाठी इतर कोणी का आले नाही? याचा विचार करणं माझ्या मनाच्या पलीकडचं आहे. हा जागतिक मंच आहे, तुम्ही इथे असायला हवे होते, पण दुर्दैवाने मला इथे कोणी दिसले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा सदस्य इथे असायला हवा होता.”

वसीम अक्रमही संतापला
वसीम अक्रमने टेन स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, ” मला माहित आहे की अध्यक्षांची तब्येत बरी नव्हती आणि पाकिस्तानातून आलेले लोक होते… पण त्यांच्यापैकी कोणीही मंचावर गेले नाही.” वसीम पुढे म्हणाका की, ” जो कोणी अध्यक्षांचे प्रतिनिधित्व करत होता तो मंचावर का गेला नाही? हा प्रश्न आहे. त्याला स्टेजवर बोलावले नव्हते का? मला यामागचे कारण माहित नाही पण पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानचा एकही प्रतिनिधी नव्हता, आम्ही यजमान देश आहोत हे बघणे मला आवडले नाही. मला हे पाहून वाईट वाटते.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *