![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २४ जानेवारी | सोनं हळूच वाढतं, चांदी अचानक उसळते—आणि सामान्य माणूस फक्त भाव ऐकूनच गार पडतो! जळगावच्या सराफा बाजारात शुक्रवारी जे घडलं, त्याला दरवाढ म्हणणं म्हणजे चांदीवर अन्याय ठरेल. अवघ्या एका दिवसात चांदीने तब्बल २२ हजार रुपयांची झेप घेतली आणि सोन्यानेही ४,३०० रुपयांची आघाडी घेत बाजाराला धक्का दिला. गुरुवारी शांत, निवांत असलेला बाजार शुक्रवारी उघडताच असा भडकलाय की ग्राहक आणि व्यापारी दोघेही एकमेकांकडे पाहत म्हणतायत— “हे नेमकं काय झालं?” , “महागाई ही हळूच येत नाही, ती थेट अंगावर धावून येते!”
गुरुवारी जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर होतं. पण शुक्रवारी सकाळी ते थेट १ लाख ५५ हजार ८०० रुपयांवर पोहोचलं. एवढी वाढही पुरेशी नव्हती, म्हणून चांदीने सगळं लक्ष स्वतःकडे खेचून घेतलं. ३ लाख ८ हजारांवरची चांदी एका दिवसात ३ लाख ३० हजारांवर! म्हणजे चांदीने फक्त भाव वाढवले नाहीत, तर विक्रमच मोडीत काढले. लग्नसराईच्या तोंडावर हे आकडे पाहून वधू-वरांचे पालक मनातल्या मनात दागिन्यांचं वजन कमी करू लागलेत!
या दरवाढीमागे कारणंही तितकीच ‘जागतिक’ आहेत. विदेशी संस्थांनी शेअर्सची विक्री सुरू केल्याने डॉलरची मागणी वाढली, रुपया थेट १२ रुपयांच्या घरात घसरला आणि त्याचा थेट फटका सोन्या-चांदीवर बसला. शेअर बाजारातही आनंद नव्हताच—बीएसई स्मॉलकॅप, मिडकॅप, निफ्टी रिअल्टी, पीएसयू बँक निर्देशांक सगळेच घसरले. अदानी पोर्ट्सपासून आयटी दिग्गजांपर्यंत अनेक शेअर्सनी गुडघे टेकले. म्हणजे शेअर बाजार म्हणतो, “आम्ही खाली,” आणि सराफा बाजार म्हणतो, “आम्ही वर!”
सामान्य माणसासाठी मात्र प्रश्न तोच—घ्यायचं की थांबायचं? गुंतवणूकदार म्हणतो, “हेच योग्य वेळ आहे,” तर ग्राहक म्हणतो, “आधी भाव स्थिर होऊ दे!” पण सोनं-चांदी दोघंही कोणाचं ऐकत नाहीत. — “आज चांदी बुलेट ट्रेन झाली आहे; पकडायचा प्रयत्न केला, तर आधी तिकीट काढावं लागेल… आणि तेही महाग!” 💸✨
