महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। उन्हाळी सुट्ट्या म्हणजे देशातील पर्यटनस्थळांसह परदेशवारीला अनेकजण पसंती देतात. त्यानुसार अनेक जण नियोजनही करतात. उन्हाळी सुट्ट्यांचे आधीच नियोजन करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे विमानाच्या तिकिटांचे दर कमी असणे. परंतु नागरिकांचा पर्यटनाचा कल लक्षात घेता विमान कंपन्यांनी समर व्हॅकेशनच्या नावावर दर ११ ते १८ टक्के इतके वाढवले आहेत. याचा फटका आता पर्यटकांच्या खिशाला बसणार आहे.
शहरातील बहुतांश नागरिक उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये श्रीनगर, भूतान, सिमला, मसुरी आदी ठिकाणी देशांतर्गत पर्यटनाला पसंती देतात. भूतानला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. क्रुझसाठीदेखील पर्यटकांचा मोठा ओढा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर येथूनस जम्मू आणि काश्मीरसाठी विमानसेवा नाही. देशांतर्गत अथवा विदेशात पर्यटनासाठी जायचे झाल्यास मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद या टप्याने प्रवास करावा लागतो. नागरिकांना छत्रपती संभाजीनगर ते श्रीनगर प्रवासासाठी नवी दिल्ली येथे एक टप्पा घ्यावा लागतो. श्रीनगरसाठी मुंबईहून मोठ्या संख्येने विमानसेवा आहे.