![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता अधिक वाढत असून, याचा फटका माणसांप्रमाणे पशू-पक्ष्यांनादेखील बसत आहे. वाढत्या उन्हामुळे दररोज कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. परिणामी, पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत.
मागील वर्षी 1 हजार पक्ष्यांमागे 5 ते 6 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. या वर्षी वातावरणात मोठा बदल झाला असून, दररोज किमान एक हजार पक्ष्यांमागे 8 ते 10 कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याचे व्यावसायिक सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून अंगाची लाहीलाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरत आहे. पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी जास्त प्रमाणात वाढले असून, याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.
उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाल्हे व परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे. तापमान 39 अंशांच्या जवळपास गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. वाढत्या उष्णतेने कोंबड्यांचे वजन वाढत नसल्याने त्यांचे हवे तसे मूल्य मिळत नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते. त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यातच सध्या नैसर्गिक संकटासोबतच कंपनीमुळे देखील पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये लावले कुलर
उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी वाल्हे परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत, उसाचे पाचट, तसेच नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर, स्प्रिंकलर, फॅन, कुलर आदी उपाययोजना केल्या आहेत. उन्हापासून पक्ष्यांच्या संरक्षणासाठी या उपाययोजना केल्याने कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.![]()
