महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. १० मार्च ।। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने घोषणा केली होती की जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर हा निधी २१०० रुपये केला जाईल. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत. कुठलीही योजना तयार होते तेव्हा एक गृहितक धरलं जातं, तीन कोटी, साडेतीन कोटी. त्या योजनेला अंतिम रुप येतं तेव्हा जर ते गृहितक २ कोटी ७० लाख झालं तर तेवढे पैसे वाचतात ना? योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर महिना आहे. आवश्यक तेवढी तरतूद आपण यामध्ये ठेवली आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून देणार याचंही उत्तर दिलं आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यासंदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललं आहे. एक लक्षात घ्या अर्थसंकल्पाचा समतोल राखणंही महत्त्वाचं आहे. घोषणा दिली आहे, तर ती पूर्ण करायची आहे. सध्या ट्रेंड्स खूप चांगले चालले आहेत. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतुदीही करणं महत्वाचं असतं. समतोल राखत पुढे जायचं आहे, त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार. एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. आम्ही २१०० रुपये कधी मिळणार ते घोषित करु. जेव्हा घोषित करु त्याच्या पुढच्या महिन्यांपासून २१०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.” असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.