महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे. सध्या तो आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येतोय. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. गेल्या हंगामात त्याने या संघाचं कर्णधारपद सोडलं आणि ही जबाबदारी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, धोनी आयपीएललाही रामराम करु शकतो. गेल्या २-३ हंगामापासून अशी चर्चा देखील सुरु आहे. मात्र आगामी हंगामापूर्वी भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने मोठा दावा केला आहे.
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊनही दमदार फलंदाजी करतोय. मात्र फिटनेस ही त्याची प्रमुख समस्या आहे. गेल्या हंगामात त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. आता त्याचा सहकारी खेळाडू रॉबिन उथप्पाच्या मते, रोहित शर्मा पुढील ४ वर्ष आयपीएल खेळत राहिला, तरी आश्चर्य वाटायला नको.
धोनीला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होतोय. त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या हंगामात त्याने फलंदाजीमध्ये चांगलाच दम दाखवला. यावेळीही त्याच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. मात्र हे हंगाम सुरु होण्यापूर्वीच धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. हे धोनीचं शेवटचं हंगाम असेल, असा अंदाज बांधला जात आहे.
काय म्हणाला रॉबिन उथप्पा ?
जिओ हॉटस्टारवर बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला, ‘ जर तुमच्यात खरंच टॅलेंट असेल, तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जर त्याने (धोनी) आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केली, तर मला आश्चर्य होणार नाही. जर तो आणखी ४ आयपीएल हंगाम खेळत राहिला, तरीदेखील मला आश्चर्य वाटणार नाही.’ धोनीची फलंदाजी दमदार असली तरीदेखील तो आगामी आयपीएल हंगामानंतर निवृत्तीची घोषणा करु शकतो. यावेळी त्याचा अन्कॅप्ड प्लेअरनुसार संघात समावेश करण्यात आला आहे.