महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। फेब्रुवारी महिन्यापासून उष्णतेच्या लाटा जाणवू लागल्या आहेत. मार्च महिन्यात तर काही ठिकाणी पारा ४१ अंश पार गेला आहे. कुठे उन्हाच्या झळा तर, कुठे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात सूर्य आग ओकत असताना तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज विदर्भातील नागपूर,अकोला,अमरावती,भंडारा, बुलढाणा,चंद्रपूर,गडचिरोली गोंदिया, वर्धा,वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात ताशी ३० ते ४० वेगाने वारे वाहतील. तर, आज पूर्व विदर्भात गारपिट आणि विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर उद्या पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होणार असून, गहू पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आजपासून तीन ते चार दिवस अमरावती जिल्ह्यासह विदर्भात ढगाळ वातावरण राहणार. मात्र, २४ मार्चनंतर पुन्हा एकदा विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाड्यासह विदर्भात लाही लाही
छत्रपती संभाजी नगरमध्ये ३८, परभणी मध्ये ३९ तर बीडमध्ये ४०.२ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात पाहायला मिळाले. अकोल्यात तापमानाचा पारा ४१.२ अंशावर पोहोचला आहे. तर, अमरावती ४०.२, ब्रह्मपुरी ४०.३, चंद्रपूर ४० तर, वर्धा जिल्ह्यात ४०.३ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये ३२ अंश तर, रत्नागिरीमध्ये ३२.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात बुधवारी ३८.७ डिग्री तापमान होते.
हवामानात बदल कमाल तापमानात घट
राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील २४ तासांत हवामानात झालेल्या बदलांमुळे, कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली आहे. कोरेगांव पार्क येथे ४१ अंशाच्या पुढे गेलेले कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस तर, तळेगांव ढमढरे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाल्यामुळे हवामानात बदल झाला आहे. कमाल तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. दिवसभर उन तर, दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.