महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २० मार्च ।। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारित असलेल्या टोल नाक्यांवरील टोलदर यंदा वाढले असले तरी, हा मार्ग ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित असल्याने येथे टोलवाढ होणार नाही.
‘एमएसआरडीसी’च्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, आता पुढील टोलवाढ ३० एप्रिल २०३० पर्यंत होणार नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना स्थिर टोलदराचा फायदा होणार आहे.
एक्सप्रेस वेवरील टोल दर दरवर्षी 6% वाढवण्याचा नियम असला तरी व्यवहार्यता आणि तांत्रिक कारणांमुळे प्रतिवर्षी वाढ न करता ती तीन वर्षांनी एकत्रितपणे 18% लागू केली जाते, ज्यामुळे वारंवार दर बदलण्याची आवश्यकता टाळली जाते आणि टोल वसुली व्यवस्थापन सोपे होते.
१ एप्रिल २०२३ रोजी या द्रुतगती मार्गावर अखेरची टोलवाढ करण्यात आली होती. आता ३० एप्रिल २०३० पर्यंत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची टोलवाढ होणार नाही, असे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.