महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. २६ मार्च ।। विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा पुढील तीन महिन्यांसाठी पूर्णपणे भरलेली आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून, कालच पहिल्या दिवशी काही तासांतच नोंदणी संपली. पूजेच्या नोंदणीमुळे मंदिर समितीला ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मंदिराच्या विविध कार्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा करण्याची संधी सर्वसामान्य भाविकांना मिळावी यासाठी मंदिर समितीने मागील काही महिन्यांपासून सर्वच पूजांची ऑनलाईन नोंदणी सुरु केली आहे. या सुविधेमुळे अनेक भाविकांना पूजा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ३१ मार्च पर्यंतच्या सर्व पूजांची नोंदणी संपल्यानंतर १ एप्रिल ते ३१ जुलै अखेरपर्यंतच्या विठ्ठल रुक्मिणीची नित्य, चंदन उटी, पाद्य, तुळशी पूजांची काल पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे.
काल पहिल्या दिवशी तीन महिन्यांसाठी विठुरायाची नित्य आणि चंदन उटी पूजा फूल्ल झाल्या आहेत. तर रुक्मिणी मातेची नित्य पूजा, चंदन उटी पूजा, पाद्य पूजा, तुळशी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. ऑनलाइन पूजा नोंदणीमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ७५ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळ्यातील उष्णतेपासून देवाला थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीला गुढीपाडवा ते मृग नक्षत्रा पर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. चंदन उटी पूजेला विशेष महत्त्व असते. विठुरायाच्या चंदन उटी पूजेला भाविकांनी पहिली पसंती दिली आहे. सर्व पूजांमध्ये मानाची असलेली असलेली विठुरायाची नित्यपूजा देखील अवघ्या काही सात फुल्ल झाली. विठुरायाच्या नित्य पूजेसाठी २५ हजार तर चंदन उटी पूजेसाठी २१ हजार रुपये देगणी शुल्क ठेवण्यात आले आहे.