महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याला दीडपटीने मागणी वाढली. या दिवशी १७५ हून अधिक फर्ममध्ये सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याचे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेतला, तर चांदीचे दर स्थिर राहिले. हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सध्या सोन्याचा भाव ९०,००० रुपयांच्या जवळ पोहोचला असून चांदीचा दर एक लाखाच्या पुढे गेला आहे. किंमती वाढल्या असल्या तरी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे प्रमुख ज्वेलर्सनी सांगितले.