गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी सुसाट ; राज्यात ८६ हजार वाहनांची नोंदणी, पुणेकर अग्रभागी, तर नाशिककर तिसरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। राज्यामध्ये दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसांत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे,

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत सर्वाधिक ११ हजार ५६ वाहनांची नोंद करण्यात आली. तर पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाची साडेसहा हजार आणि नाशिक परिवहन कार्यालय अंतर्गत तिसऱ्या क्रमांकाची साडेतीन हजारांवर वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. यंदानागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चारचाकी कार प्रकारात सन २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात सन २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून, २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणी
पुणे : ११ हजार ५६
पिंपरी-चिंचवड ६ हजार ६४८
नाशिक : ३ हजार ६२६
मुंबई (मध्य): ३ हजार १५४
ठाणे : ३ हजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *