महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी राज्यासह परराज्यातून सुमारे 90 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गतआठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंड पुरीचे बेत होत असल्याने रविवारी फळभाज्यांना उठाव कमी राहिला. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 4 टेम्पो, राजस्थान येथून 5 ते 6 ट्रक गाजर, कर्नाटक येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, हिमाचल प्रदेश 2 ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो तोतापुरी कैरी, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 550 ते 600 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार पेटी, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 ते 4 टेम्पो, मटार 500 ते 600 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 55 ते 60 ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 25 टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे भावही स्थिर
मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. येथील घाऊक बाजारात कोथिंबिरीची सुमारे 90 हजार जुडी आवक झाली. तर, मेथीची 40 हजार जुडीची आवक झाली. गतआठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीसह मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या जुडीचे भाव 15 रुपयांच्या आत आहेत. किरकोळ बाजारात एका गड्डीची 5 ते 20 रुपयांना विक्री करण्यात येत आहे.