US Stock Market: अमेरिकेच्या निर्णयाने शेअर बाजार गुंतवणूकदारांची चांदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक घोषणा यूएस शेअर मार्केटच्या पथ्यावर पडली आहे. ट्रम्प यांनी चीन वगळता 75 देशांवरील वाढीव टॅरिफला 90 दिवसांचा पॉज लावला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर याची घोषणा केली असून यासह त्यांनी चीनवरील परस्पर शुल्क तात्काळ प्रभावाने 125 टक्क्यांपर्यंत वाढवले.

यासोबतच ट्रम्प म्हणाले की, ज्या 75 हून अधिक देशांनी अमेरिकेशी व्यापार, शुल्क, चलन फेरफार आणि इतर गैर-मौद्रिक मुद्द्यांवर वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि ज्यांनी अमेरिकेविरुद्ध कोणतीही सूडाची कारवाई केलेली नाही, त्यांच्यासाठी त्यांनी 90 दिवसांसाठी ‘परस्पर शुल्क’ थांबवले आणि 10% नवीन शुल्क जाहीर केले. हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होईल. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडून हा एक सकारात्मक उपक्रम आहे, जेणेकरून चर्चेचा मार्ग खुला राहील

नव्या टॅरिफ घोषणेनंतर शेअर बाजारात विक्रमी वाढ
टॅरिफच्या चिंतेमुळे गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बाजारांना मोठ्या घसरणीला समोरे जावे लागले आहे. अमेरिकन शेअर मार्केटमधूनही लोक बाहेर पडू लागले पण, हळूहळू बाजार सावरला आणि बुधवारी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये एका दिवसांत तेजीच वादळ आलं. अमेरिकन निर्देशांक डाउ जोन्सने २०२० नंतरचा सर्वात मोठा एकदिवसीय वाढ नोंदवली तर, आशियाई बाजार देखील मोठ्या वाढीसह व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, गिफ्ट निफ्टी देखील ७५२ अंकांनी वधारला पण, आज महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद असल्यामुळे देशांतर्गत मार्केटला या संकेतांचा फायदा घेणे शक्य होणार नाही.

अमेरिकेच्या घोषणेमुळे शेअर बाजारात तेजीचे वादळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर करांवर 90 दिवसांची स्थगिती जाहीर केल्यानंतर बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. ट्रम्प टॅरिफबाबत काय भूमिका घेतात याची अमेरिकन शेअर बाजार लक्ष ठेवून असून ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताच की गुंतवणूकदारांनी लगेचच शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. डाऊ जोन्स इतिहासात प्रथमच 3,000 अंकांनी वधारला, ज्याचा परिणाम आशियाई बाजारांमध्ये दिसत आहे.

व्यापारादरम्यान डाऊ जोन्सने पहिल्यांदाच 3,000 पेक्षा जास्त अंकांची हनुमान उडी घेतली आणि शेवटी 2,963 अंक किंवा 7.87 टक्क्यांनी वधारला. त्याचवेळी, एस अँड पी500 निर्देशांक 9.52% आणि नॅसडॅकने 12.16% उडी घेतली. अशाप्रकारे ऑक्टोबर 208 पासून S&P500 साठी हा सर्वोत्तम दिवस ठरला. त्याचप्रमाणे, नॅसडॅकसाठी जानेवारी 2001 पासून सर्वोत्तम आणि इतिहासातील दुसरा सर्वोत्तम दिवस होता. डाऊ जोन्सने गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी तेजी अनुभवली. अशा स्थितीत, यावरून दिसून येते की बाजार या मुद्द्यावर स्पष्टतेसाठी किती आतुर होता.

टॅरिफच्या दणक्यानंतर सुटकेचा नि:श्वास
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले असून या काळात लाखो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. अनेक अब्जाधीश गुंतवणूकदारांनी ट्रम्पच्या शुल्कांवर टीका केली आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदीचा इशाराही दिला. पण, आता या 90 दिवसांच्या पॉजमुळे अमेरिकेचे परस्पर शुल्क टाळण्यासाठी इतर देशांना वाटाघाटी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

या दिलासानंतर, आशियाई बाजारपेठांमध्ये प्रचंड खुश दिसत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 8%, हँग सेंग 4.5% आणि तैवानच्या बाजारात सुमारे 9% वाढ झाली. त्याचवेळी, गिफ्ट निफ्टी फ्युचर्स 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 23,260 वर व्यवहार करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *