महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज ढगांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळं या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणपासून ते तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात एकीकडे उन्हाची काहिली वाढली आहे. चर तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर गारांचा पाऊसदेखील झाला.
विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात वादळासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात जालना, बीड, परभणी, हिंगोली येथे उष्ण हवामानाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात पाऊस
बीड जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून तापमानाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर गेल्याने नागरिक प्रचंड उष्णतेने हैराण झाले होते. एकीकडे पाण्याचा तीव्र दुष्काळ असताना, दुसरीकडे तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना पाहायला मिळत आहे. मात्र याच उष्णतेचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांना जोरदार पावसाने दिलासा दिला आहे. बीडच्या केज परिसरात सुसाट वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या पावसाने नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा आणि ज्वारी बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात आंब्याचा अक्षरशः सडा पाहायला मिळाला. पहिल्यांदाच आंब्याचे उत्पन्न चांगले झाले होते. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात आंबा पिक जमीनदोस्त झाला आहे.