PM Awas Yojana: एकही व्यक्ती बेघर राहणार नाही; केंद्र आणखी १० लाख घरांना देणार मान्यता, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। ‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून, केंद्र सरकारकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करू या,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. ‘प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा,’ अशी सूचना त्यांनी केली.

ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे यशदा येथे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.

‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर विजेची सुविधा देण्याची गरज आहे. राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सर्व कार्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या परीक्षणानंतर उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नोंद करण्यात येईल. साडेबारा हजार कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले आहे. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

पाच किलोमीटर क्षेत्रात आरोग्य सुविधा
‘पुढील पाच वर्षांत नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक पाच किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या सरकारी आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सुधारणा घडवून आणल्यास सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

३० लाख घरे उभारणार
‘साडे तेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली असून दहा लाख घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यातील ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ३० लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येईल. जिल्हा परिषदेवरील विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…
जलजीवन योजनेतील त्रुटी बाजूला करून ती योजना प्रभावीपणे राबवा.
बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांचे प्रशिक्षण घ्यावे.
बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *