महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासनाने महानगरपालिकेच्या हद्दीतील फिनिक्स मॉल ते खराडीदरम्यान दुमजली उड्डाणपूल बांधण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे या चौकात होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उन्नत महामार्ग (एलिव्हेटेड) मार्ग उभारण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे (एमएसआयडी) फिनिक्स मॉल ते खराडी बायपासच्या असा सुमारे चार किलोमीटरचा मार्ग उन्नत महामार्गातून वगळण्यात आला होता. त्यामुळे हा मार्ग फिनिक्स चौकातूनच करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील देण्यात आले होते.
सुरुवातीला हा मार्ग एनएचएआयमार्फत करण्यात येणार होता. पुणे ते शिरूर असा 56 किलोमीटर लांबीचा हा मार्ग प्रस्तावित होता. यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांच्या खर्चदेखील अपेक्षित होता. मात्र, राज्य सरकारने वेगाने रस्त्यांचा विकास करण्यासाठी गेल्या वर्षी एमएसआयडीची स्थापना केली.
यामुळे या मार्गाचे काम हे एमएसआयडीला देण्यात आले. दरम्यान, पालिकेमार्फत खराडी बायपास चौकातून उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर बांधण्याचे ठरले. मात्र, या मार्गावरील विकासकामे ही एनएचआयएच्या कामांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे काम एमएसआयडीला दिल्यावर या मार्गाचे काम हे उन्नत महामार्गातून वगळण्यात आले होते.
हा मार्ग पुन्हा या कामात अंतर्भूत करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. यासाठी अजित पवार यांनादेखील निवेदन देण्यात आले होते. तसेच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी देखील एमएसआयडीसीच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून हे काम उन्नत मार्गातून वगळण्यात येऊ नये, अशी सूचना केली होती. नागरिकांच्या मागणीचा विचार करून फिनिक्स मॉल ते खराडीपर्यंत रस्त्याचे काम उन्नत मार्गात समाविष्ट करण्यात आले असून, येथे एलिव्हेटेड पूल तयार करण्यात येणार आहे.
कर आकारणी करण्याचेही आदेश
पुणे ते शिरूर, अहमदनगर ते देवगड या महामार्गाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 2008 च्या पथकर धोरणानुसार सर्व प्रकारच्या वाहनांवर पथकर आकारणी करण्यात यावी, असे देखील आदेश शासनाने दिले आहेत.
\