महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। कोणी कितीही संभ्रम निर्माण केला, तरी माझ्या लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका मी तुमच्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत येथे दिला.
वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा प्रसाद मंगल कार्यालयात शनिवारी (ता. २६) पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री नवाब मलिक, आमदार राजू नवघरे, आमदार विक्रम काळे, रामदास पाटील सुमठाणकर, तानाजी बेंडे, बालूमामा ढोरे, मुजीब पठाण, कांचनताई शिंदे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, लाडक्या बहिणींसाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करण्यासाठी महावितरणला १७ हजार कोटी रुपये राज्य सरकारने भरले आहेत, असे एकूण ६५ हजार कोटी रुपये आम्ही या योजनांसाठी राखीव ठेवले आहेत. त्यामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही.
तसेच सर्व जाती-धर्मांचे नागरिक एकसंघ राहातील, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम भूमिका राहील. आपण महायुतीमध्ये गेलो असलो, तरी आपली विचारधारा आपण बदललेली नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील, तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी वाढवावी.
हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झाला पाहिजे, यासाठी काम करा. मी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी माझे उपमुख्यमंत्रिपद डावाला लावेन; पण आपल्या जिल्ह्याला कधीही विकास निधी कमी पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.