महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० एप्रिल ।। राज्यातील उष्ण लहरी पुन्हा तीव्र होण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी (दि.29) अकोला 44.6 तर पुणे शहरातील लोहगाव आणि कोरेगावचे तापमान 42 अंशांवर गेले होते. राज्यातील सर्वच जिल्हा भट्टीप्रमाणे तापला असून यंदाचा उन्हाळा असह्य ठरला आहे.
यंदाचा एप्रिल आजवरच्या अनेक उन्हाळ्यात वेगळा आणि सर्वांत उष्ण ठरला आहे. कारण उन्हाळ्यात पडणारा सरासरी पाऊस एकही दिवस न झाल्याने उन्हाची तीव्रता अतिप्रखर गटांत गणली गेली. दिवसभर वणवा पेटावा तसा यंदाचा उन्हाळा जाणवत असल्याचे नागरिकांसह शास्त्रज्ञांचे मत आहे. मंगळवारी राज्यातील बहुतांश भागाचे तापमान 42 ते 43 अंशांवर गेले होते. प्रामुख्याने विदर्भ अन् मध्य, उत्तर महाराष्ट्रात कमालीचा उष्मा जाणवला.
मंगळवारचे तापमान
अकोला 44.6, अमरावती 43, बुलडाणा 40.7, ब्रम्हपुरी 42.5, चंद्रपूर 42.8, गोंदिया 37.4, नागपूर 43.3, वाशिम 42.6, वर्धा 43, यवतमाळ 41.4, पुणे (लोहगाव 42.2, शिवाजीनगर 40.2,), जळगाव 43.1, कोल्हापूर 37.8, महाबळेश्वर 32.9, मालेगाव 42.5, नाशिक 39.8, सातारा 40.7, सोलापूर 42.9, मुंबई 34.2, धाराशिव 41.6, छ. संभाजीनगर 42.6