एक्सप्रेसवेवरील कोंडीला नवा फटका? उरण–कर्जत–शिरूर महामार्गासाठी हालचाली; १२०० कोटींची योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ मार्च २०२६ ।। Mumbai-Pune Expresswayवरील सततची वाहतूक कोंडी आता नवा पर्याय शोधण्यास भाग पाडत आहे. गेल्या महिन्यात तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर राज्य सरकारवर पर्यायी मार्ग उभारण्याचा दबाव वाढला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. अनेक महिने फाईलमध्ये अडकलेला उरण–कर्जत–शिरूर महामार्ग प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सुमारे १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या दिवशी एक्सप्रेसवेवर हमखास कोंडी होत असल्याने प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हींची दमछाक होत आहे.

गेल्या काही वर्षांत अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्तीमुळे दोन-दोन दिवस कोंडीचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे–मुंबई वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे, हे वारंवार स्पष्ट झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये मंत्रिमंडळात या मार्गाचा प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष कामास गती मिळाली नव्हती. आता १३५ किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर–चाकण–तळेगाव–कर्जत–उरण मल्टिनोडल कॉरिडॉर हा पर्याय म्हणून पुढे येत आहे. हा मार्ग उभारला गेल्यास औद्योगिक पट्ट्यांतील मालवाहतूक थेट बंदराशी जोडली जाणार आहे.

या कॉरिडॉरमुळे शिरूर, चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रांना थेट Jawaharlal Nehru Port Authority (जेएनपीटी) बंदराशी जोड मिळेल. त्यामुळे नगर रस्ता आणि एक्सप्रेसवेवरील मालवाहू वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुणे–पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक ताण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घटू शकतो. मात्र, प्रकल्प अद्याप मंजुरी आणि अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. वारंवार होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा पर्याय प्रत्यक्षात कधी येणार, आणि प्रशासन यासाठी ठोस निर्णय कधी घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *