महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० एप्रिल ।। कोकणात जाणारा एक महत्त्वाचा रस्ता लवकरच पूर्ण क्षमतेने नागरिकांसाठी खुला होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यांच्या पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा 15 दिवसांतच पूर्ववत होईल त्यामुळं 15 मेपूर्वी दोन्ही बोगद्यांतील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल, अशी माहिती समोर आली आहे.
कशेडी बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे सुरू असून 15 मेपूर्वी दोन्ही बोगद्यांतील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली. 15 मेपूर्वी दोन्ही बोगद्यांतून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पंकज गोसावी यांनी सांगितले. कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणांच्या कालावधीत चाकरमान्यांनी बोगद्यातूनच प्रवास करण्यास पसंती दिली होती. येत्या 10-15 दिवसांत बोगद्यात 24 तास वीजपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळं प्रवाशांची चिंता मिटणार आहे. ऐन उन्बाळ्यात दोन्ही बोगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राउंटींगचा अवलंब करण्यात येणार आहे. हे काम हाती घेण्यात आले असून लवकरच बोगद्यातील गळती थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कशेडी बोगद्यातील मार्गावर दोन्ही बाजूला 200 पथदीपांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्युत खांबासह आवश्यक ती यंत्र सामुग्री उपलब्ध झाली आहे. काहीच दिवसांतच पथदीपांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवसांचा अवधी लागणार आहे. 15 मे पूर्वी दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळं सुट्टीच्या काळात नागरिकांचे प्रवास सोप्पा होणार आहे.
कशेडी घाटातून 40 मिनिटांचे अंतर 15 मिनिटांत पार
कशेडी बोगदा हा 2 किमी लांबीचा असून येथे प्रवास करताना 40 किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांना आहे. पोलादपूर येथील भोगाव पासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी इथं बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. नऊ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.