महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मे ।। केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटकल अफेअर्सच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने येत्या काळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत काँग्रेसकडून देखील करण्यात आलं आहे. त्यादरम्या, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘जनगणनेची मागणी काँग्रेसची होती, राहुल गांधीची होती. सातत्याने या सगळ्या प्रवासामध्ये, भारत जोडोदरम्यान देखील ही मागणी करण्यात आली होती, आणि सत्यता पुढे आली पाहिजे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजन तसेच ओबीसींवर जो अन्याय होतोय. त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत नव्हतं, अशी भुमिका मांडणारे कोण होते? काँग्रेसनं मांडली ती भुमिका. अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतात. आता मंडल किंवा कमंडल ते इतिहासात गाळलं गेलं असं आम्ही समजू. चांगला निर्णय कुठेतरी होतोय आणि या जातनिहाय जनगणनेमधून ओबीसींच्या हक्काचं जे काही हिरावलं गेलं होतं. ते आरक्षणाचा प्रश्न होता, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम झालं होतं. आज त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. या निर्णयाला त्यांनीच विरोध केला होता. पण आता त्यांची मानसिकता बदलून हा निर्णय होत असेल, तर आमची एवढीच मागणी आहे. बिहारच्या निवडणुका तोंडावर ठेवून हा निर्णय होता कामा नये.’ असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. २०२१ला जनगणना होणं अपेक्षित होतं, मात्र त्यावेळी करोना संसर्गामुळे जनगणना करण्यात आली नव्हती. आता यापुढे जी जनगणना होईल ती जातनिहाय जनगणना असेल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती देताना जातनिहाय जनगणनेसंदर्भातील माहिती देताना काँग्रेसवर देखील टीका केली. काँग्रेसनं केवळ सर्वेक्षण करुन घेतल्याचं म्हटलं आहे.