महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे ।। महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून निर्माण झालेले अवकाळी पावसाचं वातावरण अद्याप कायम असून, महामुंबई परिसरात आज, मंगळवार आणि उद्या, बुधवारसाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, वाशीम, अमरावती, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.
सौराष्ट्रापासून अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पश्चिम राजस्थानजवळ चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील वातावरणावर या प्रणालींचा परिणाम होत असून मंगळवारी मुंबईत, तर मंगळवार आणि बुधवारी ठाण्यामध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असू शकेल. पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस यलो ॲलर्ट देण्यात आला आहे.
Orange Alert – #Wardha #Yavatmal #Bhandara #Chandrapur #Gadchiroli #Gondia
Yellow alert – #Nagpur #Washim #Amaravti #Buldhana #AkolaBy @Indiametdept pic.twitter.com/OyvXaFXTq1
— नेत्वा धुरी NETWA DHURI (@netwadhuri) May 12, 2025
मुंबईमध्ये सध्या आर्द्रता वाढली असून तापमानातही पुन्हा वाढ झाल्याने आठवड्याची सुरुवातच पुन्हा प्रचंड उकाड्याने झाली. सांताक्रूझ येथे ३४.६ अंश, तर कुलाबा येथे ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारनंतर तापमान आणखी वाढण्याचा अंदाज असून गुरुवार, शुक्रवारी तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. या आठवाड्याअखेरपर्यंत आभाळ अंशतः ढगाळ राहण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज मंगळवारी अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशीव या जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह, हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असू शकेल. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना शुक्रवारपर्यंत ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर, लातूर येथेही दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मात्र सर्वदूर अवकाळी पावसाची उपस्थिती असेल, असा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथे बुधवारी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. भंडाऱ्यात गुरुवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी केला आहे.