Monsoon Update : अंदमानात मान्सून दाखल, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी अंदमान बेटावर दाखल झाले आहेत. यंदा पाच दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, आणि निकोबार बेटांवर मान्सून धडकला असल्याची माहिती भारताच्या हवामान खात्यानं दिलीय. मान्सून दाखल होताच अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावलीय.

मान्सून सध्या अंदमान बेटांवर सक्रिय असून तिथे गेल्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झालीय. पुढील दोन दिवसही पावसाचा जोर असाच राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आकाशातील ढगांची दाटी, परावर्तित होणारा प्रकाश, आणि पश्‍चिमी वाऱ्यांचे प्रवाह हे सर्व मान्सूनच्या सुरुवातीची लक्षणं आहेत.

अंदमानात सुरुवात झाल्यानंतर मान्सूनचा वेग चांगला असून २७ मेपर्यंत तो केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल. यंदा मान्सूनने आपल्या वेळेच्या पाच दिवस आधीच हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, गोंदिया, भंडारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार लवकरच महाराष्ट्रातही मान्सून पोहोचणार आहे आणि राज्यभरात पावसाला सुरुवात होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *