महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे ।। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींनी आम्हाला मते दिल्याचे सांगितले. वास्तविक, लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला. त्या घोटाळ्यावर पांघरुणही घातले. सरकारने लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून तिकडे लक्ष विचलित करून ईव्हीएम घोटाळ्यावर पांघरुण घातले आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री कडू यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रहारचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफी, २० टक्के बोनस अनुदान देण्याची घोषणा भाजप महायुतीने निवडणुकीत केल्या. सत्तेत बसल्यानंतर सामान्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. युरियाची किंमत ४३८ आणि कंपन्यांना सबसिडी एका पोत्याला १५०० रुपये दिली जाते. त्यातूनही कोट्यवधी रुपये कंपन्यांना दिले जातात.
जात-धर्माच्या प्रश्नावर लोकांना गुंतवून या प्रश्नापासून बाजूला ठेवण्याचे काम केले जात आहे. पीक विमा योजनेत तीन तरतुदी रद्द करून एकच तरतूद ठेवली आहे. त्यात आता फक्त पीक कापणीच्या प्रयोगावर जेवढे नुकसान दिसेल, तेवढीच भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी विमा योजनेत २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी चार हजार ७१ रुपये भरले तर, सरकारने त्या कंपन्यांना भरपाईपोटी ३२ हजार ५५० रुपये भरले. कंपन्यांच्या गळ्यात हे पैसे टाकले जात आहेत. थेट लाभार्थ्यांच्या योजना संपविण्याच्या तयारीत सरकार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘भाजपने निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली. आता, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफी देता येत नाही, असे म्हणत असतील तर ती शेतकऱ्यांची फसवणूकच आहे.’’ कर्जमाफीची रक्कम ३५ हजार कोटी आहे. त्यासाठी बारामतीत दोन जूनला जाऊन अजित पवार यांना कर्जमाफी कशी देता येईल, हे सांगणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
गांधीकडून राष्ट्रीयीकरण, मोदींकडून खासगीकरण
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे अर्थव्यवस्था सामान्य लोकांपर्यंत गेली. अर्थकारणात समतोल आला. गरिबांच्या हातात पैसा जाऊ लागला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांचे खासगीकरण सुरू केले आहे. या खासगीकरणामुळे श्रीमंत आणखी श्रीमंत, तर गरीब आणखी गरीब होणार असल्याचेही श्री. कडू यांनी सांगितले.