महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।।पुण्याचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात नोकरी, शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी अनेकजण स्थलांतर करत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मेट्रो हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. पुणे मेट्रोशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे. पुणे मेट्रोने नागरिकांसाठी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यानुसार १०० रुपयांमध्ये पुणेकरांनी अमर्यादित प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी १०० रुपयांचा दैनिक पास ही संकल्पना साकारली आहे. हा पास वापरुन प्रवासी पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अमर्यादित प्रवास करु शकणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या या पर्यायाचे कौतुक होत आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्गाला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. यामुळे पैसे आणि वेळ दोन्हींची बचत होईल असा विश्वास मेट्रो प्रशासनाला आहे.
पुणे शहरातील वाढत्या विस्तारात आणि वेळेवर प्रवासाच्या गरजेमध्ये, पुणे मेट्रोने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. केवळ १०० रुपयांमध्ये ‘दैनिक पास’ उपलब्ध करून दिल्याने, प्रवाशांना पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अमर्यादित प्रवास करता येणार आहे. हा निर्णय पुणेकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर, वक्तशीर आणि परवडणारा होणार आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा फक्त पुणेकरांनाच नाही, तर पर्यावरणाला देखील होईल असे म्हटले जात आहे. १०० रुपयांच्या पासमुळे अधिकाधिक लोक मेट्रोने प्रवास करतील, त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होईल. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही प्रमाणात मार्गी लागेल असे म्हटले जात आहे.