महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।। रेशन दुकानात जर कुठे गैरप्रकार होत असेल तर तक्रार करा. कारवाई केली जाईल, असे आवाहन नवे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. 23) शिर्डीत येऊन साईंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, की राज्यात 54 हजार रेशन दुकाने आहेत. कोरोना काळात सगळे लोक घरी असताना रेशन दुकानदार, हमाल, चालक अधिकारी यांनी एकविचाराने गरजूंपर्यंत धान्य पोहोचवले. रेशन दुकानांविषयी तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल.
सुप्रीम कोर्टाने ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण दिले आहे, त्यावर समाधान व्यक्त करून आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे; आरक्षणात चुकीची माणसे घुसणार नाहीत, ते जनतेने ठरवले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते भुजबळ यांचा साईंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. साई मंदिराचे प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते. मंत्रिपद असले काय किंवा नसले काय, तरी मी बालपणापासून शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येत होतो. साई मंदिर हे असे स्थान आहे की जनतेची अधिक चांगली सेवा करण्याची शक्ती या ठिकाणी मिळते. चांगले काम करण्यासाठी साईंनी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना मी केली, असे भुजबळांनी सांगितले.
पालकमंत्री पदाच्या वादात पडायचे नाही
नाशिकचा पालकमंत्री या विषयावर वादविवाद नको. पालकमंत्री होऊन किंवा नसलो तरी मी जनतेची सेवा करू शकतो. त्यामुळे मला पालकमंत्री या वादात पडायचे नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मंत्रीपद कधी येते कधी जाते याचा नेम नाही?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले अशीच चर्चा आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले, की ‘मी दहा वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. राजकारणात मंत्रिपद कधी येते कधी आणि कसे जाते, याचा नेम नाही. हे घडत असते!’