महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ताे भारताचा 35 वा कसोटी कर्णधार ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आता शुभमन गिलच्या कर्णधारपदाने भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. गिल इंग्लंडच्या आव्हानाला कसे सामोरे जाईल आणि WTC मध्ये भारताला कशा पद्धतीने पुढे नेईल, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही नावे कायमस्वरूपी कोरली गेली आहेत. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 34 कर्णधारांनी संघाचे नेतृत्व केले आहे. सी. के. नायडू यांनी 1932 मध्ये भारताचा पहिला कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. यानंतर सुनील गावस्कर, कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. या दिग्गजांनी भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर यशाच्या शिखरावर नेले. तर रोहित शर्मा हा अलीकडील कर्णधार होता.आता, 2025 मध्ये, एक नवे नाव या यादीत सामील होत आहे. शुभमन गिल. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचा 35 वा कर्णधार म्हणून नियुक्त झालेला हा युवा तारा इंग्लंड दौऱ्यावर (20 जून 2025 पासून) भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात करणार आहे. गिलने यापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-20 मालिकेत यशस्वी नेतृत्व केले आहे आणि आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सला गुणतक्त्यात अव्वल स्थानावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कर्णधारपदी शुभमन गिलची निवड का?
रोहित शर्माने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तर जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून 25 वर्षीय शुभमन गिलवर विश्वास दाखवला आहे. गिलने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांच्याशी झालेल्या बैठकीत कर्णधारपदाबाबत चर्चा केली होती, जिथे त्याला नेतृत्वाची जबाबदारी देण्याचे संकेत मिळाले होते.काही तज्ज्ञांनी गिलच्या फलंदाजीच्या सातत्यावर प्रश्न उपस्थित केले असले, तरी त्याच्या नेतृत्व कौशल्यावर निवड समितीचा पूर्ण विश्वास आहे. गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे यशस्वी नेतृत्व केले असून, 2025 च्या हंगामात 10 पैकी 7 सामने जिंकून त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
टीम इंडियाचे आजवरचे युवा कसोटी कर्णधार
भारताच्या कसोटी कर्णधारांच्या यादीत लाला अमरनाथ, विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनील गावसकर, कपिल देव, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. गिल हा या यादीत सामील होणारा सर्वात युवा कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नियुक्तीने भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या युगाला सुरुवात होत आहे, विशेषत: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC 2025-27) दृष्टीने.
इंग्लंड दौऱ्यात गिलसमोरील आव्हानं काय आहेत?
20 जून 2025 पासून लीड्स येथे सुरू होणारी ही मालिका WTC 2025-27 च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. इंग्लंडचा संघ त्यांच्या मायभूमीवर नेहमीच आव्हानात्मक ठरतो, आणि गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला बेन स्टोक्सच्या आक्रमक ‘बॅझबॉल’ शैलीला सामोरे जावे लागेल. गिलच्या नेतृत्वाखालील युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल संघ या मालिकेत कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी गिलच्या कर्णधारपदाबाबत सावध आशावाद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गिलकडे नेतृत्वाची क्षमता आहे, परंतु त्याला त्याच्या फलंदाजीवर सातत्य राखावे लागेल. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी गिलची तुलना विराट कोहलीशी करत त्याला “भारताचा पुढील सुपरस्टार” संबोधले होते.