![]()
महाराष्ट्र 24 : विशेष प्रतिनिधी: नवी सांगवी : समाजात महिला सशक्तीकरणाच्या घोषणा अनेकदा ऐकायला मिळतात; पण त्या प्रत्यक्ष कृतीत उतरल्या कीच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. नवी सांगवी येथील श्रीगणेश सहकारी बँक मर्यादित येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत आत्मीय आणि सन्मानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. बँकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय बाईत आणि सांगवी शाखा व्यवस्थापक श्री. ईश्वर काटे यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि पेन देऊन करण्यात आला. कार्यालयीन कामकाजाच्या धावपळीमध्येही महिला दिनाचा हा छोटेखानी पण अर्थपूर्ण सोहळा उपस्थितांच्या मनात आनंदाची लहर निर्माण करून गेला.
या प्रसंगी बँकेतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये पासिंग ऑफिसर सौ. श्रेया देशमुख, मनिषा सोनार, सुनिता गोवलकर, सौ. श्वेता पवार, तसेच रोखपाल सौ. स्मिता येरगट्टीकर, लेखनिक पोर्णिमा पाटील, सौ. सुर्वणा लांडे, सौ. माधुरी देशमुख, सौ. रुपाली हिंगाडे, सौ. निकिता घुले, सौ. पुजा गलांडे, सौ. सुनिता कोकाटे, सौ. स्वाती हिप्परगे, निलिमा साळुंके, वैष्णवी कवाष्टे आणि सिध्दी भेगडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अमित गुजर, निलेश साबळे, निलेश सोनवणे, अशिष चौगुले, रोशन परदेशी, रोहन कदम, दिपक भोजने, शंकर तापकीर, सचिन काटे, मयुरेश देवकर आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. गुलाबाच्या एका फुलातून व्यक्त झालेला हा सन्मान बँकेतील सहकार्याच्या आणि कुटुंबवत्सल वातावरणाच्या संस्कृतीची साक्ष देत होता.
विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने यांनी गेली तब्बल बारा ते तेरा वर्षे एक परंपरा जपली आहे. महिला दिन आला की ते न चुकता बँकेतील महिला कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प आणि पेन देऊन त्यांचा सन्मान करतात. आजच्या धावत्या जगात परंपरा जपणे सोपे नसते; पण भोजने यांनी ती सातत्याने जपून महिलांविषयीचा आदर केवळ शब्दांत नाही तर कृतीतून दाखवून दिला आहे. छोट्या कृतीतून मोठा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांना प्रेरणा देणारा ठरला. त्यामुळे श्रीगणेश सहकारी बँकेत साजरा झालेला महिला दिन केवळ कार्यक्रम न राहता, परस्पर आदर, कृतज्ञता आणि कार्यसंस्कृती यांचा सुंदर मिलाफ ठरला.