महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। राज्यात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.