![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून ।। जलसंपदा विभागाने दोन्ही महापालिकांसोबत स्थापन केलेल्या पूर नियंत्रण कक्षासाठी अखेर मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. पुणे आणि पिंपरी महापालिकेने प्रत्येकी सहा कर्मचारी या कक्षासाठी दिले आहे. हा कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे.
प्रत्येक आठ तासांच्या कालावधीत जलसंपदा आणि महापालिकेचे प्रत्येकी दोन कर्मचारी कार्यरत राहतील. आपत्कालिन परिस्थितीत अर्थात पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वी महापालिका आणि अन्य यंत्रणांना खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा 70 टक्क्यांपर्यंत आल्यास पूरस्थितीची पूर्वसूचना देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा 90 टक्क्यांवर साठा येताच त्याची माहिती दिली जाणार आहे. (Latest Pune News)
गेल्या वर्षी खडकवासला धरण परिसरात तसेच शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी शिरल्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली. पूर्वसूचना न देता धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्याची टीका जलसंपदा विभागावर करण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली काम करणार आहे. या नियंत्रण कक्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे ठरले होते. तसेच जलसंपदा विभागाचे 3 कर्मचारी 24 या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
जलसंपदा विभागाने 22 मे रोजी पुणे व पिंपरी महापालिकेला कर्मचारी पुरविण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, त्यावर निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर 5 जून रोजी दुसरे स्मरणपत्रही देण्यात आले तरीही कर्मचारी देण्यात आले नव्हते. यावरून या संवेदनशील मुद्द्याबाबत महापालिकांची बेफिकीर असल्याचे दिसून आली होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांना पत्र दिले होते. दोन्ही महापालिकांना कर्मचारी दिल्याने कक्षाचे काम सुरू झाले आहे.
– श्वेता कुर्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प
