Trump vs Musk वाद थांबता थांबेना ! टेस्ला गुंतवणूकदारांची होरपळ ; कुठे बिनसली मैत्री?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुलै ।। ‘पॉवर इज पॉवर’… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेम ऑफ थ्रोन्स या टीव्ही मालिकेतील हा संवाद बरोबर सिद्ध करून दाखवत आहेत. दररोज कोणाशी तरी भिडणारे ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा कधीकाळचा आपला मित्र आणि अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांना नडले आहेत. मंगळवारचा दिवस टेस्ला शेअर्ससाठी अ‘मंगल’वार ठरला आणि टेस्ला शेअर्समधील घसरणीसह ट्रम्प यांनी दाखवून दिले आहे की सत्तेची ताकद हीच खरी ताकद आहे, पैसा कधीही त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.

डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मास्क यांच्यातील वाद वाढला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला-स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांच्यातील सुरू असलेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी मस्क यांची टीका अशीच सुरू राहिली तर त्यांचे सरकार टेस्ला आणि स्पेसएक्सला दिली जाणारी अब्जावधी डॉलर्सची सबसिडी थांबवेल असा इशारा दिला.

मस्क यांनी ट्रम्पच्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल’वर टीका केल्यापासून दोघांमधील मैत्रीच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी सबसिडी काढून टाकण्याची धमकी दिली ज्यामुळे टेस्लाला खूप फायदा देत आहे. मंगळवारी अमेरिकन सिनेटने विधेयक अतिशय कमी मतांनी मंजूर केले.

टेस्ला शेअर्स धडाम
जगातील सर्वात मोठी EV कार उत्पादक कंपनी टेस्लाचे शेअर्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात 8% कोसळले आणि दिवसाच्या नीचांकी $293.21 प्रति शेअरवर पातळीवर पोहोचले. नॅसडॅकवर सूचिबद्ध 11 कोटींहून अधिक शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली. टेस्ला सीईओ एलन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील शाब्दिक युद्धाची झळ अमेरिकन बाजाराला सहन करावी लागली, ज्यामुळे वॉल स्ट्रीटपासून ते भारतीय गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला.

सुरुवातीच्या मोठ्या घसरणीनंतर टेस्ला शेअर्स दिवसाच्या शेवटी काही प्रमाणात सावरले आणि मंगळवारी 5.34% घसरून क्लोज झाले असून यामुळे मस्कला अब्जावधींचे नुकसान होऊ शकते.

मस्क-ट्रम्प वाद: काय प्रकरण आहे?
ट्रम्प यांनी मस्कला अमेरिकेतून हद्दपार करण्याची धमकी दिल्याने टेस्लाच्या शेअर्समधील ही उलथापालथ सुरू झाली. मस्क यांनी ट्रम्पच्या प्रस्तावित ‘वन बिग ब्युटीफुल बिल’चे ‘विशाल आणि हास्यास्पद’ म्हणून उल्लेख केला आणि म्हटले की यामुळे ‘अमेरिका दिवाळखोर‘ होईल.

प्रत्युत्तरात मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘मला माहित नाही, आम्हाला पाहावं लागेल. आपण DOGE ला एलनवर सोडू शकतो. तुम्हाला माहिती आहे DOGE म्हणजे काय? DOGE हा एक राक्षस आहे जो एलनला खाऊ शकतो.’ DOGE म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, ज्याचे मे 2025 पर्यंत मस्क प्रमुख होते.

मस्कवर निशाणा साधताना ट्रम्प म्हणाले, ‘मस्क माझ्या विधेयकावर हल्ला करत आहे कारण त्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सबसिडी काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. मस्क यावर रागावले आहेत पण मी सांगतो की तो यापेक्षा बरंच काही गमावू शकतो.’

ट्रम्पने टेस्ला आणि मस्कची दुसरी कंपनी स्पेसएक्सला दिलेल्या सरकारी सबसिडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या तीक्ष्ण वक्तव्यामुळे टेस्लाच्या शेअर्सवर मोठा दबाव आला. दरम्यान, मस्क-ट्रम्प वादाचा परिणाम केवळ टेस्लापुरता मर्यादित राहिला नाही तर, मंगळवारी वॉल स्ट्रीटचे प्रमुख निर्देशांकही दबावाखाली दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *