महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जुलै ।। अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेचा आज मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा बालाजी हॉटेल ते मिरा रोड पूर्व असा निघणार आहे. पण मोर्चाच्या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही मनसे मोर्चावर ठाम आहे. दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तसेच मोर्चाआधीच मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी का नाकारली? फडणवीस म्हणाले…
दरम्यान, मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी का नाकारली? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”जो मोर्चाचा मार्ग आहे तोच घ्यावा. त्याच मार्गाने मोर्चा निघावा. पण त्यांना विशिष्ट मार्गाने मोर्चा काढायचा होता. यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले. योग्य मार्गाने मोर्चा काढणार असाल तर परवानगी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले