महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। पुणे-नागपूर ही बहुप्रतिक्षित वंदे भारत एक्सप्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर रेल्वे स्थानकावर ऑनलाइन उद्घाटन झाले. ही वंदे भारत देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळपास ९०० किलोमीटरचे अंतर अवघ्या 12 तासांत पार होणार आहे. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा 3 तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे स्थानकावरील गर्दीमुळे ही गाडी हडपसर स्थानकावरून सुटेल. यामुळे विदर्भातील आयटी व्यावसायिक आणि पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल.
देशात आज नव्या तीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार –
पंतप्रधान मोदी आज देशात ३ नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करणार आहे. मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाइन पार पडेल. नागपूर स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच खासदार आणि मान्यवर उपस्थित राहतील. याचवेळी बंगळुरू-बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत सेवांचाही शुभारंभ होईल.
वंदे भारत एक्सप्रेस नागपूर (अजनी) येथून सकाळी 9:50 वाजता सुटेल आणि रात्री 9:50 वाजता पुण्याच्या हडपसर स्थानकावर पोहोचेल. पुण्याहून सकाळी 6:25 वाजता सुटून संध्याकाळी 6:25 वाजता अजनीला पोहोचेल. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावेल. नागपूरहून सोमवारी आणि पुण्याहून गुरुवारी बंद राहील. ही वंदे भारत एक्सप्रेस १० स्थानकावर थांबेल. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर (अहिल्यानगर), दौंड या स्थानकावर ही एक्सप्रेस थांबणार आहे.
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सध्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार स्वरूपात धावणार आहे. प्रवाशांची स्लीपर कोचची मागणी होती, पण रेल्वेकडून एसी चेअर कार उपलब्ध करण्यात आली आहे. पुढील वर्षी स्लीपर ट्रेन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एसी चेअर कारसाठी 1500 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 3500 रुपये.