महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कोकवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. कामानिमित्त कोकणातील असंख्य लोक हे मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहे. जेव्हा जेव्हा गणपती, शिमगा असतो तेव्हा हे कोकणातील लोक आपल्या आपल्या गावाकडे जातात. या लोकांना अनेक वर्षांपासून चाकरमानी या शब्दाने संबोधले जाते. मात्र हा शब्द कोकणवासीयांसाठी अवमानकारक असल्याचे म्हणत सरकारनेच आता महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. यापुढे या लोकांना चाकरमानी या शब्दाने संबोधले जाणार नाही. तर कोकणवासीय असं त्यांना म्हटल जाईल, असा आदेशच आता राज्य सरकार काढणार आहे. ‘कोकणवासीय’ असा शब्द वापरा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. एवढंच नाही तर या आदेशाचे लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे. (migrated from konkan to mumbai call themselves konkanwasi not chakarmani Government will issue an order ajit pawar )
उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई – गोवा महामार्गाच्या संबंधात बैठक पार पाडली. या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी ‘चाकरमानी’ हा शब्द अपमानकारक वाटत असल्याचे सांगितलं. सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत यापुढे ‘चाकरमानी’ शब्दाऐवजी ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. लवकरच शक्य झाले तर गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचे शासन परिपत्रक काढले येणार आहे.
संघटनांनी घेतला होता आक्षेप!
अनेक वर्षांपासून कोकणातून कामासाठी मुंबईसह इतर शहरात आलेल्या लोकांना चाकरमानी या शब्दाने संबोधले जायचे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रूढ झाल्या पाहिला मिळाला होता.
विशेषत: शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. एसटी किंवा रेल्वेने निघणाऱ्या या कोकणवासीयांना रूढ अर्थाने चाकरमानी म्हटले जात होते. चाकरमानी हा शब्द ‘चाकर’ (सेवक) आणि ‘मानी’ (मानणारा) यांच्या संयोगातून निर्माण झाला आहे. यालाच कोकणवासियांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी ‘चाकरमानी’ या शब्दावर त्यांनी आक्षेप दाखवला होता. त्यांच्या मते हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा असून शासनाकडे त्यांनी आपली मागणी मांडली होती. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकारकडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या स्वाभिमानाला आणि सांस्कृतिक ओळखीला अधिक सन्मान देण्यासाठी ‘कोकणवासीय’ हा शब्द वापरण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.