महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गणेश प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागातील मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदलाबाबत माहिती देण्यात आली असून पर्याय मार्ग देखील सांगण्यात आले आहेत.
गणेश प्रतिष्ठापना म्हणजेच बुधवारी शिवाजी रोड वरील गाडगीळ पुतळा चौक ते गोतीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज तसेच अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, मोती चौक त्याच बरोबर मंगला टॉकीज समोरील रस्ता या ठिकाणी जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पीएमपी बससाठी सुद्धा पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर बसस्थानकावरून शिवाजी रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता आणि टिळक रस्त्याने स्वारगेटला जातील. मनपा बसस्थानकावरून स्वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने स्वारगेटला जातील. या दिवशी पुणेकरांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शिवाजी रोडवर गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीस बंद असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना संताजी घोरपडे पथावरून, कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे वळविण्यात येईल. झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पुल मार्गे कुंभारवाडयाकडे जाणाऱ्या वाहनांनी शिवाजीपुल मार्गे जावे. सिंहगड रस्त्यावर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गांवर रस्त्यालगत पार्किंग करण्यास मनाई असून पार्किंग व्यवस्था मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम ब्रीज येथे असेल.