महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑगस्ट ।। म्हसवडमधील कार्यक्रम आटाेपल्यावर कोल्हापूरच्या नियोजित कार्यक्रमासाठी काल रात्री मोटारीतून निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काल सायंकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर पाच तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचा फटका खुद्द उपमुख्यमंत्री पवार यांना बसला. त्यांना काहीकाळ प्रतीक्षा करून कोल्हापूरला न जाता येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला.
पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम कऱ्हाड, मलकापूर, जखिणवाडी, नांदलापूर परिसरात सुरू आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास महामार्गावरील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. काल दुपारी चारच्या सुमारास मलकापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश व शिवजयंती उत्सव मंडळांची गणेश आगमनाचीही मिरवणूक महामार्गावरून नेण्यात येत होती. रात्री दहा वाजेपर्यंत ही मिरवणूक सुरू होती.
या कालावधीत महामार्गावरील वाहतूक विस्कळित होऊन वाहतूक कोंडी झाली. त्याचा वाहनचालकांसह स्थानिकांना सामना करावा लागला. त्याचदरम्यान, उपमुख्यमंत्री पवार हे म्हसवडचा कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे नियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. मात्र, महामार्गावरील कोंडीत त्यांचा ताफा अडकला. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी काहीकाळ वाट पाहून त्यांचा नियोजित कोल्हापूर मुक्काम रद्द केला. त्यांनी महामार्गावरून थेट येथील शासकीय विश्रामगृह गाठले.
त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका उपमुख्यमंत्री पवार यांनाच बसल्याने त्याचीच चर्चा सुरू होती. दरम्यान, आज पहाटे सहा वाजता प्रशासनाच्या वतीने पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर ते मोटारीने नियोजित दौऱ्यासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले.